मुख्य सामग्रीवर वगळा

69अल -हाक्का (The Sure Reality)

69अल -हाक्का (The Sure Reality)
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 
1 ती अटळरित्या घडणारी घटका. 2 काय आहे ती अटळ घटका? 3 ती अटळ घटका काय आहे, हे तुम्हाला कशामुळे ज्ञात होईल? 4 समूद व आद या जमातींनी अचानकपणे आदळणाऱ्या  आपत्तीला खोटे ठरविले होते. 5 समूद ही जमात एका भयंकर स्फोटाने नष्ट केली गेली. 6 आणि आद ही जमात देखील बेफाम अशा वादळाद्वारे नष्ट केली गेली. 7 त्याद्वारे अल्लाहने सात रात्री व आठ दिवस त्यांना अखंडपणे वेढून ठेवले. पाहणारा पाहू शकतो की, ते तिथे असे पालथे पडलेले आहेत की, जणू ते खजुरीच्या वृक्षाच्या खाली पडलेल्या फांद्या आहेत. 8 तुम्हाला आता त्यांचे कोणतेही अवशेष दिसतात का? 9 अशाचप्रकारे फिरऔनने आणि त्याच्या पूर्वीच्या लोकांनी, तसेच उलथवून टाकलेल्या वस्त्यांमधील लोकांनीही अपराधी कृत्ये केली होती. 10 त्यांनी आपल्या पालनकर्त्याकडून आलेल्या पैगंबराची अवज्ञा केली. परिणामी (शेवटी) अल्लाहने त्यांना कठोरपणे फैलावर घेतले. 11 (लोकांनो! जेव्हा नूहच्या काळात) जेव्हा पाण्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, तेव्हा आम्हीच तरंगत्या नौकेत तुम्हाला (म्हणजेच मानवी वंशाच्या दिव्याला) सुरक्षित बसविले होते. 12 ते यासाठी की, आम्ही त्या घटनेस तुमच्यासाठी बोध घेण्याचे साधन बनवावे. आणि (संदेश ग्रहण करणाऱ्या) कानांनी ते ग्रहण करून लक्षात ठेवावे. 
13 आणि जेव्हा एकदाच जोराने फुंकर मारून शिंग फुंकण्यात येईल. 14 आणि पृथ्वी व त्यावरील पर्वतांना वर उचलून एकाच दणक्यात त्यांचे तुकडे-तुकडे केले जातील. 15 त्या दिवशी ती घडणारी महान घटना घडून येईल. 16 आणि आकाश फाटून जाईल तर त्या दिवशी तो अगदी निष्प्रभ होऊन जाईल. 17 आणि स्वर्गदूत त्याच्या (चहूबाजूंनी) कडेवर असतील. त्या दिवशी तुझ्या पालनकर्त्याच्या  महासिंहासनाला आठ स्वर्गदूत उचलून धरलेले असतील. 18 त्या दिवशी तुम्हाला (अल्लाहच्या न्यायालयात) हजर केले जाईल. तेव्हा तुमची कोणतीही गुपिते लपून राहणार नाहीत (असा असेल न्यायाचा दिवस). 
19 तेव्हा ज्याचे कर्मपत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल, तो (खूश होऊन इतरांना) म्हणेल, 'हे पाहा माझे कर्मपत्र आणि वाचा. 20 मला विश्वास होता की, मला (एके दिवशी) माझ्या (कर्मांचा) हिशेब अवश्य पाहायला मिळणार आहे.' 21 तेव्हा त्याला (खऱ्या अर्थाने) सुखी जीवन लाभेल, 22 आलिशान अशा स्वर्गात. 23 तिथे फळांचे घोस त्यांच्या सहज हाताला येतील. 24 आम्ही त्यांना सांगू, 'खा व प्या अगदी आनंदाने, विगत दिवसांमध्ये तुम्ही जी चांगली कृत्ये केलीत त्याच्या फलस्वरूप.' 25 पण ज्या माणसाला, त्याचे कर्मपत्र त्याच्या डाव्या हातात सुपूर्द  केले जाईल. तेव्हा तो म्हणेल, 'अरेरे, माझे कर्मपत्र मला कधीच दिले गेले नसते तर (फार बरे झाले असते)!  26 आणि मला माझे हिशेबही कधीच कळाले नसते तर.....! 27 (किती बरे झाले असते!) जर त्या मृत्यूने माझे (कायमस्वरूपी) अंत घडवून आणले असते. 28 माझी धनसंपत्ती माझ्या काहीच कामी आलेली नाही. 29 आता माझे सर्व अधिकार संपुष्टात आलेले आहेत.' 30 (आज्ञा होईल,) 'त्याला पकडा  आणि त्याच्या गळ्यात साखळदंड घाला. 31 आणि मग त्याला नरकात फेकून दया. 32 मग त्याला (त्याच्यासारख्या इतर अपराध्यांसोबत) सत्तर गज एवढ्या लांब साखळीने जखडून टाका.'  33 कारण तो सर्वशक्तिमान अल्लाहवर विश्वास ठेवत नव्हता. 34 तसेच तो गरजू लोकांना अन्नदान करण्यासाठी (ना स्वतः पुढे सरसावला,) ना त्याने इतरांना त्यासाठी प्रेरित केले. 35 म्हणूनच आज इथे कोणीही त्याचा हितचिंतक नाही. 36 आणि गलिच्छ (वस्तूंखेरीज) त्याला कोणतेही अन्न मिळणार नाही. 37 जे केवळ अपराधी लोक खातील. 
38 पण नाही, ( लोकांनो !) मी त्या सर्वांना साक्षी बनवून सांगतो, ज्यांना तुम्ही पाहता. 39 आणि ते सर्व ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही. 40 निःसंदेह हे कुराण सन्माननीय पैगंबराने आणलेली ईश्वरवाणी आहे. 41 आणि ही काही कोणा कवीची रचना नाही. पण तुम्ही जशी दृढ श्रद्धा ठेवायला हवी, तशी श्रद्धा अजिबात ठेवत नाही. 42 हे (कुराण) कोणा  भविष्यवेत्त्याची वाणी नाही. पण तुम्ही जसे चिंतन करायला हवे, तसे चिंतन अजिबात करीत नाही. 43 हे (कुराण) सर्व जगांचा पालनकर्ता असलेल्या अल्लाहकडून प्रकट करण्यात आलेले आहे. आणि 44 जर या (पैगंबराने) आमच्याविषयी खोटी गोष्ट रचली असती, 45 तर आम्ही त्याचा उजवा हात धरून...46 त्याच्या मानेची धमनी कापून टाकली असती. 47 आणि तुमच्यापैकी कोणीही आम्हाला असे करण्यापासून रोखू शकला नसता . 48 निःसंदेह, हे (कुराण) बोधग्रंध आहे - त्यांच्यासाठी जे ईशभिरु आहेत. 49 आम्हाला चांगले ठाऊक आहे की, तुमच्यामध्ये काही, आमच्या संदेशांना खोटे ठरविणारे आहेत. 50 (पण) असे करणे सत्य नाकारणाऱ्या लोकांसाठी निश्चितपणे पश्चातापाचे कारण ठरणार आहे. 51 यात मुळीच शंका नाही की, हे (कुराण) कोणत्याही प्रकारच्या भेसळीपासून मुक्त असे निर्भेळ सत्य आहे. 52 तर तुम्ही आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे स्तुतिगान करीत राहा. 
-----------------------------------------------------------
अनुवादक -अब्दुर रहमान चाऊस, नांदेड 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...