68 अल -कलम (The Pen or Nun)
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 नून लेखणीची शपथ , आणि ते जे काही (लेखणीने) लिहितात (त्याची शपथ).
2 (पैगंबर !) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडसर नाही आहात. 3 निश्चितच, तुमच्यासाठी कधीही न संपणारे चांगले प्रतिफळ आहे. 4 सद्वर्तनाच्या बाबतीत तुम्ही आदर्श आहात , यात मुळीच शंका नाही. 5 लवकरच तुम्हीही पाहाल आणि तेही पाहतील की........
6 तुमच्यापैकी वेडाने झपाटलेला कोण होता. 7 तुमचा पालनकर्ताच चांगल्याप्रकारे जाणतो की, कोण त्याच्या मार्गापासून ढळला आहे. आणि कोण त्याच्या मार्गावर आढळपणे मार्गस्थ आहे, हेही त्याला चांगले ठाऊक आहे.
8 म्हणून तुम्ही सत्य नाकारणाऱ्यांच्या (आवडी-निवडीच्या) प्रभावात येऊ नका. 9 ते तर अशी इच्छा बाळगून आहेत की, तुम्ही थोडे नमते घ्यावे आणि तेही थोडे नमते घेतील. 10 तुम्ही सारख्या शपथा घेऊन बोलणाऱ्या नीच माणसाचे म्हणणे मान्य मारू नका. (त्यावर विश्वास करू नका). 11 आणि जो (माघारी कोणाचीही) निंदानालस्ती व चहाड्या करीत फिरतो. 12 आणि जो सत्कृत्यांस प्रतिबंध करणारा, मर्यादांचे उल्लंघन करणारा, अन्यायी वर्तन करणारा आहे. 13 जो निष्ठुर आहे आणि या सर्व वाईट गुणांसह कमअस्सलही आहे. 14 त्याच्या (मगरूरीचे) कारण, त्याच्याकडे भरपूर संपत्ती व अपत्ये आहेत. 15 जेव्हा आमचे संदेश त्याला ऐकविले जातात, तेव्हा तो म्हणतो, 'या आधीच्या लोकांच्या निराधार कहाण्या आहेत.' 16 लवकरच आम्ही त्याच्या नाकावर डाग देऊ.
17 आम्ही यांची परीक्षा पाहत आहोत, ज्याप्रमाणे आम्ही त्या बागवाल्यांची परीक्षा पहिली होती. ज्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बागेतील सर्व फळे तोडण्याचा निश्चय बोलून दाखविला होता. 18 (त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवताना) ' अल्लाहची इच्छा झाल्यास उद्या असे आम्ही करू,' असे म्हटले नाही. 19 हे (रात्री) झोपेतच होते की, तुझ्या पालनकर्त्याकडून एक विपत्ती त्या बागेवर आली. 20 आणि सकाळी त्या बागेची अशी अवस्था झाल्याचे आढळून आले, जणू त्याची आधीच कापणी झालेली आहे (आता तिथे बाग नसून, पडीत जमीन आहे). 21 (इकडे) सकाळी उठल्यानंतर यांनी (बागेत जाण्यासाठी) एकमेकांना हाक दिली. 22 म्हणाले, 'जर सर्व फळे तोडायची असतील, तर शेतावर सकाळीच गेलेले बरे.' 23 मग ते शेताकडे निघाले, व जाताना आपसात कुजबुज करीत होते. 24 म्हणाले, 'आज कोणताही गरीब (गरजू) माणूस बागेत प्रवेश करता कामा नये.' 25 ते भल्या पहाटे असा निश्चय करून निघाले. त्यांना वाटले (कोणाला द्यायचे, कोणाला नाही हे) ठरविण्याचा त्यांना अधिकार आहे. 26 पण जेव्हा त्यांनी ते पहिले (तेव्हा ते त्यास ओळखू शकले नाही). ते म्हणाले, 'आम्ही वाट चुकलो असणार !' 27 (मग थोडा वेळ विचार करून म्हणाले,) 'नाही, आम्ही पूर्णपणे बरबाद झालो आहोत.' 28 त्यांच्यातील (तुलनात्मक दृष्ट्या) जो भला माणूस होता, तो म्हणाला, ' मी तुम्हाला म्हटले नव्हते का की , तुम्ही अल्लाहचे स्तुतिगान का करीत नाही?' 29 त्यांनी उत्तर दिले, 'आमचा पालनकर्ता असलेला अल्लाहच, असीम माहिमावान आहे. खरोखर, आम्हीच चुकीचे वागत होतो.' 30 मग ते आपसात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. 31 (शेवटी) ते म्हणाले, 'आमचा धिक्कार असो! खरोखर, आम्हीच अत्यंत चुकीने वागत होतो. 32 शक्य आहे, आमचा पालनकर्ता आम्हाला याऐवजी याहून चांगली बाग प्रदान करेल , कारण आता आम्ही त्याच्याकडेच वळलो आहोत.' 33 (अपराधी लोकांवर या जगातही) अशाप्रकारे शिक्षा केली जाते. पण या नंतरच्या जगातील शिक्षा तर याहूनही भयंकर मोठी आहे. कदाचित या लोकांना याची जाणीव झाली असती तर (त्यांचे भले झाले असते).
34 (अल्लाहची) जाण ठेवून जीवन व्यतीत करणाऱ्यांसाठी त्यांच्या पालनकर्त्याकडे ऐश्वर्यसंपन्न असा स्वर्ग आहे. 35 आम्ही सच्च्या भक्तांना अपराध्यांसमान करून टाकणार आहोत की काय? 36 तुम्हाला झाले तरी काय, किती वाईट निर्णय करीत आहात तुम्ही? 37 असा एखादा (विशेष) ग्रंथ आहे का तुमच्याकडे, जो तुम्हाला असे सांगतो? 38 त्यात तुम्हाला ते सर्व आढळते, जे तुम्हाला हवे असते? 39 किंवा तुम्हाला आमच्याकडून असे पक्के वचन प्राप्त झालेले आहे की काय, जे पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत आमच्यावर बंधनकारक असेल की, जे तुम्ही ठरवाल ते निश्चितपणे तुम्हाला मिळून राहील? 40 त्यांना विचारा, 'तुमच्यापैकी कोण याची हमी देणारा आहे?' 41 किंवा त्यांनी ठरवलेले कोणी अल्लाहचे समकक्ष असतील आणि त्यांच्या दाव्यात ते जराही गंभीर असतील, तर त्यांनी त्या (ईश्वरीय सत्तेच्या) भागीदारांना समोर आणावे.
42 त्या दिवशी संपूर्ण सत्यावरून (अदृश्याचा) पडदा दूर केला जाईल, आणि (सत्य नाकारत राहिलेल्यांना अल्लाहसमोर) नतमस्तक होण्यास सांगितले जाईल, पण तेव्हा ते नतमस्तक (होण्यासाठी प्रयत्न करूनही) नतमस्तक होऊ शकणार नाहीत. 43 (शरमेने) त्यांच्या नजरा खाली झालेल्या असतील, नामुष्कीने ग्रस्त अशा अवस्थेत ते असतील. त्यांना (जगात) अल्लाहसमोर नतमस्तक होण्यासाठी सांगितले जात होते, पण ते धडधाकट असूनही (त्या आज्ञेचे पालन करीत नसत). 44 (पैगंबर!) जे लोक या संदेशाला खोटे ठरवितात, त्यांना माझ्यावर सोडून द्या (मी त्यांना पाहून घेईन). त्यांना आम्ही, त्यांना कळणारही नाही, अशा रीतीने हळू-हळू (विनाशाकडे) ओढत आहोत. 45 मी त्यांना (काही काळ) उसंत देत आहे, कारण माझी योजना अगदी पक्की आहे.
46 तुम्ही त्यांच्याकडे (हा संदेश पोचविल्याबद्दल) काही मोबदला मागत आहात की काय, ज्यामुळे (बिचारे) त्या भुरदंडाच्या ओझ्याने दबले जात आहेत? 47 किंवा (त्यांना असे वाटते की), त्यांच्या आवाक्यात अदृश्याचे ज्ञान आहे आणि ते ज्ञान, ते लिहून घेत आहेत? 48 (पैगंबर!) तर तुम्ही आपल्या पालनकर्त्याचा निर्णय होईपर्यंत सहनशीलतापूर्वक प्रतीक्षा करा. आणि त्याच्याप्रमाणे (म्हणजे युनूसप्रमाणे, सयंम गमावू नका), ज्याला माशाने गिळले होते. तेव्हा त्याने (अल्लाहचा) धावा केला. तेव्हा तो फार दुःखी-कष्टी झालेला होता. 49 जर त्याच्या पालनकर्त्याकडून त्याच्यावर मेहेरबानी झाली नसती, तर अत्यंत वाईट अवस्थेत खडकाळ मैदानात तो फेकला गेला असता. 50 पण त्याच्या पालनकर्त्याने (आपल्या कार्यासाठी) त्याची निवड केली आणि सदाचारी लोकांत त्याचा समावेश केला. 51 जेव्हा सत्य नाकारणारे लोक या उपदेशास ऐकतात (म्हणजे या कुराणास), तेव्हा ते तुम्हाला आपल्या क्रोधीत नजरांनी अशाप्रकारे पाहू लागतात, जणू ते तुम्हालाही (अशाप्रकारे प्रतिसाद देऊन या उपदेशापासून) दूर करणार आहेत. आणि म्हणतात, ' तो निश्चितपणे वेडा आहे.' 52 (पैगंबर, तुम्ही सबुरीने घ्या,) हे कुराण समस्त मानवजातीसाठी (अल्लाहकडून) आलेल्या बोधग्रंथाशिवाय अन्य काहीच नाही.
मराठीत अनुवाद- अब्दुर-रहमान चाऊस,नांदेड
टिप्पण्या