72 अल - जिन्न
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर!) लोकांना सांगा, ' माझ्याकडे असा संदेश प्रकट करण्यात आला आहे की, जिन्नच्या एका समूहाने या कुराणास ऐकले, तेव्हा ते आपल्या (साथीदारांना) म्हणाले, "आम्ही (अगदी) भारावून टाकणारे असे कुराण ऐकले आहे. 2 जो सन्मार्ग दाखवणारा आहे, आणि म्हणून आम्ही त्यावर श्रद्धा धारण केली, आणि आम्ही कोणालाही आमच्या पालनकर्त्याचे समकक्ष ठरविणार नाही. 3 आमच्या पालनकर्त्याची महिमा फार मोठी आहे. त्याने स्वतःसाठी ना पत्नी बनविली, ना पुत्र. 4 आमच्यातील मूर्ख अल्लाहविषयी काही असत्य व निराधार विधाने करीत असत. 5 आम्हाला तर वाटले होते, माणूस व जिन्न अल्लाहविषयी खोट्या गोष्टी कधीही उच्चारणार नाहीत. 6 माणसांमध्ये काही असे होते, जे भूतकाळात जिन्नपैकी काहींचा आश्रय मागायचे, असे करून त्यांनी केवळ त्या जिन्नांच्या गर्वात वाढ केली होती. 7 आणि जसे तुम्हाला वाटत होते, तसेच त्यांनाही वाटत होते की, अल्लाहने कधीही कोणालाही पैगंबर बनवून पाठविलेले नाही (ना पुढे पाठवेल.)
8 आम्ही आकाशाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला आढळले की, ते शक्तिशाली रखवालदार आणि उल्का यांच्यासह (तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पिटाळून लावण्यासाठी) सज्ज आहेत. 9 आणि आम्ही पूर्वी आकाशातील काही स्थानांवर (परलोकाच्या वार्ता) ऐकण्याच्या उद्देशाने बसायचो, पण आता जो कोणी काही ऐकण्याचे प्रयत्न करतो, तर त्याला पिटाळून लावण्यासाठी आगीचा गोळा तयार असतो. 10 आम्ही नाही सांगू शकत की, (त्या व्यवस्थेद्वारे) भूतलावर राहणाऱ्या लोकांचे काही वाईट इच्छिले गेले की, त्यांच्या पालनकर्त्याने त्यांचे काही भले इच्छिलेले आहे. 11 आमच्यात काही सदाचारी आहेत, तर काही (सदाचारी) नाहीत. आणि आमच्यात भिन्न-भिन्न मार्गांचा अवलंब करणारे आहेत. 12 आणि आम्हाला हे कळून चुकलेले आहे की, आम्ही पृथ्वीवर अल्लाहच्या योजनेला अयशस्वी करू शकत नाही, ना त्याच्यापासून पळून जाऊन त्याच्या योजनेला विफल करू शकतो. 13 आणि जेव्हा आम्ही मार्दर्शनाचे बोल ऐकले, तेव्हा (लगेच) त्यावर विश्वास ठेवणारे बनलोय. जो कोणी आपल्या पालनकर्त्याला विश्वास ठेवून (जीवन व्यतीत करेल), तर (यानंतरच्या जीवनात) कसल्याही नुकसानाच्या , ना अन्यायाच्या भयाने तो ग्रस्त होईल. 14 आणि आमच्यापैकी काही (अल्लाहचे) आज्ञापालन करणारे आहेत आणि काही वाट चुकलेले आहेत. तर ज्यांनी आज्ञापालन केले. तेच सन्मार्गावर मार्गस्थ झाले. 15 पण जे वाट चुकलेले आहेत तेच नरकाच्या आगीचे इंधन बनतील. " '
16 (पैगंबर!) लोकांना सांगा,) 'माझ्याकडे असा संदेश आला आहे की, जर त्यांनी सन्मार्ग अवलंबिला असता, तर आम्ही त्यांच्यावर भरपूर पर्जन्यवृष्टी (म्हणजेच कृपाप्रसादांचा वर्षाव) अवश्य केला असता.' 17 ते यासाठी की, त्याद्वारे आम्हाला त्यांची परीक्षा पाहता यावी. आणि जो कोणी आपल्या पालनकर्त्याच्या स्मरणाकडे पाठ फिरवेल, तर तो त्यास कठोर शिक्षा करेल.
18 आणि (लक्षात ठेवा) मशिदी केवळ अल्लाहची उपासना करण्याची ठिकाणे आहेत. म्हणून तुम्ही अल्लाहसोबत इतर कोणाचाही धावा करू नका (म्हणजे केवळ अल्लाहचाच धावा करा.) 19 आणि (एकदा असे घडले) की, त्याचा सेवक (म्हणजे पैगंबर मुहम्मद) त्याची प्रार्थना करण्यासाठी उभा राहतो, तेव्हा (सत्य नाकारणारे) तिथे येऊन गर्दी करतात आणि त्याचे श्वास गुदमरवून टाकणारे कृत्य करतात. 20 त्यांना सांगा , 'मी केवळ माझ्या पालनकर्त्याचा धावा करतो, आणि कोणालाही त्याचा भागीदार ठरवीत नाही. 21 (पैगंबर!) सांगा, 'मला कोणत्याही प्रकारे तुमचे भले-वाईट करण्याचा अधिकार नाही.
22 सांगा, 'अल्लाहच्या (कोपा) पासून मला कोणीही वाचवू शकत नाही. ना त्याच्याव्यतिरिक्त इतर कुठे मला आश्रयस्थान मिळू शकते. 23 अल्लाहकडून जे संदेश मला प्राप्त होतात, ते (लोकांपर्यंत) पोहोचविणे एवढेच माझे कर्तव्य आहे.' आणि जो कोणी अल्लाह व त्याच्या पैगंबराची अवज्ञा करेल त्याच्यासाठी नरकाची आग अटळ आहे. जिथे असे लोक कायम वास्तव्य करतील.
24 ज्या गोष्टीचे (सध्या) त्यांना वचन दिले जात आहे, जेव्हा तिला ते आपल्यासमोर पाहतील, तेव्हा त्यांना कळून चुकेल की, कोणाचे साहाय्यकर्ते दुर्बल आहेत. आणि कोणाची संख्या अल्प आहे. 25 त्यांना सांगा, ' ज्या गोष्टीचे तुम्हाला वचन दिले जात आहे, ती गोष्ट निकट आहे की, माझ्या पालनकर्त्याने तिच्या मुदतीत दीर्घ वाढ केलेली आहे, मला ते माहीत नाही.' 26जिथे कोणाचीच बुद्धी पोचत नाही त्या गोष्टी जाणणारा केवळ तोच आहे, त्या गोष्टी तो कोणावरही उघड करीत नसतो. 27 यास अपवाद फक्त त्या पैगंबरांचा असतो ज्यास त्याने नियुक्त केलेले असते. आणि त्याच्या सुरक्षेसाठी (स्वर्गदूतांपैकी) रक्षक त्याच्या पुढे व मागे चालायला लावतो. 28 ते यासाठी की, हे स्पष्ट होऊन जावे कि, (पैगंबरांनी) आपल्या पालनकर्त्याचे संदेश (लोकांपर्यंत ) पोहोचिले आहेत. आणि त्यांच्याकडे जे-जे आहे, त्या सर्वांना अल्लाहने वेढून ठेवलेले आहे. आणि जे-जे अस्तित्वात आहे, त्यांची तो गणना करून ठेवत असतो.
____________________________________
अनुवादक - अब्दुर रहमान चाऊस, नांदेड
टिप्पण्या