74 अल मुद्दस्सीर
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 स्वतःवर चादर पांघरून असलेल्या (पैगंबरा!) 2 उठ आणि लोकांना सावध कर. 3 आणि आपल्या पालनकर्त्याचे स्तुतीगान कर. 4 आपली वस्त्रे स्वच्छ ठेव. 5 आणि सर्व प्रकारच्या अपवित्रतेपासून स्वतःला दूर ठेव. 6 आणि परोपकारी कृत्य करून बदल्यात अधिक प्राप्त करण्याची इच्छा बाळगू नको. 7 (संदेश पोचविताना, जे विघ्न येतील) ते आपल्या पालनकर्त्याखातर सहन कर.
8 मग जेव्हा (पुनरुत्थानाचे) शिंग फुंकण्यात येईल. 9 तो फार कठीण दिवस असेल. 10 सत्य नाकारत राहिलेल्या लोकांसाठी मुळीच सुखकर असणार नाही. 11 त्याच्याबरोबर मला एकटा सोडा, ज्याला मी निर्माण केलेले आहे (त्याला मी पाहून घेईन). 12 आणि त्याला मी विपुल प्रमाणात धनसंपत्ती दिली. 13 आणि त्याच्याबरोबर असणारी मुले. 14 आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारची साधने उपलब्ध केली. 15 पण तो (माझे आभार म्हणण्याऐवजी,) मी त्याला आणखी जास्त द्यावे, अशी लालसा बाळगतो. 16 कदापि नाही! तो तर आमच्या संदेशांचा शत्रू आहे. 17 लवकरच मी त्याला अशा पर्वतावर चढायला लावीन, (ज्यावर चढून त्याचे) फार वाईट हाल होतील.
18 त्याने (आमच्या संदेशांना खोटे ठरविण्यासाठी) विचारपूर्वक कट कारस्थाने रचली. 19 त्याचा नाश होवो! त्याने कशी कटकारस्थाने रचली! 20 पुन्हा त्याचा सर्वनाश होवो! त्याने कशा अटकळी बांधल्या! 21 मग त्याने पुन्हा विचार करत (सभोवार) नजर टाकली. 22 मग त्याने आठ्या घातल्या व तोंड वाकडे केले. 23 मग (आमच्या संदेशाकडे) पाठ फिरवली आणि मगरूरीचे प्रदर्शन केले. 24 आणि म्हणाला, ‘हे अन्य काही नसून प्राचीन काळापासून चालत आलेली एक जादू आहे.’ 25 (आणि पुढे म्हणाला,) ‘ हे कुराण अन्य काही नसून केवळ माणसाची रचना आहे.’
26 (अल्लाह म्हणतो) ‘मी त्याला लवकरच नरकात फेकून देईन. 27 तुम्हाला काय माहीत, नरक काय चीज आहे? 28 तिची आग ना जिवंत राहू देईल, ना मरू देईल. 29 माणसाची त्वचा भाजून टाकणारी. 30 तिच्यावर एकोणीस रखवालदार नियुक्त आहेत. 31आणि आम्ही स्वर्गदूतांनाच (म्हणजे angels ना) नरकाच्या आगीवर रक्षक म्हणून केलेले आहे. आणि आम्ही त्यांची संख्या (जाहीर करण्यामागचे) कारण असे आहे की, त्याद्वारे सत्य नाकारणाऱ्यांची परीक्षा पाहता यावी आणि ग्रंथधारकांची श्रद्धा अधिक दृढ व्हावी. आणि श्रद्धावंतांच्या श्रद्धेत वाढ व्हावी. तसेच आधीचे ग्रंथधारक व (या कुराणावर विश्वास ठेवणारे) श्रद्धावंत यांनी कोणत्याही प्रकारे शंका बाळगू नये. आणि ज्यांच्या मनात विकृती आहे आणि जे सत्य नाकारणारे आहेत, ते म्हणतील, ‘असे उदाहरण प्रस्तुत करून (तुमच्या) अल्लाहला काय म्हणायचे आहे?’ अशाचप्रकारे अल्लाह इच्छितो त्यास भरकटण्यासाठी सोडून देतो आणि इच्छितो त्यास सन्मार्ग दाखवतो. आणि तुझ्या पालनकर्त्याच्या सेनेला त्याच्याशिवाय दुसरा कोणीच जाणू शकत नाही. आणि हे (कुराण) केवळ मानवजातीच्या उपदेशासाठी आहे.
32 नाही, त्या चंद्राची शपथ! 33 आणि रात्रीची जेव्हा ती सरते. 34 आणि त्या सकाळची जेव्हा ती प्रकाशमान होते. 35 खरोखर, नरकाची आग भयानक गोष्टींपैकी एक आहे. 36 माणसाला भिवनिण्यास पुरेशी आहे. 37 तुमच्यापैकी प्रत्येक माणसाला (भय दाखवणारी) जो पुढे जाऊ इच्छितो किंवा मागे राहू इच्छितो. 38 प्रत्येक मनुष्य त्याने जे काही केलेले आहे, त्याच्या बदल्यात गहाण आहे. 39 यास अपवाद फक्त उजव्या बाजूचे (सदाचारी) लोक आहते. 40 ते स्वर्गाच्या बागांत असतील आणि ते विचारात असतील. 41 अपराध्यांविषयी. 42 ‘कोणत्या गोष्टीने तुम्हाला नरकाच्या आगीत आणलेले आहे?’ 43 ते उत्तर देतील, ‘आम्ही नमाजाचे पालन करणाऱ्यांपैकी नव्हतो. 44 तसेच आम्ही गरिबांना खाऊ घालत नसत. 45 आणि आम्ही व्यर्थ वादविवाद करणाऱ्यांसोबत, ते करायचो. 46 आणि आम्ही न्यायाच्या दिवसाला नाकारायचो. 47 (असेच आमचे सुरु राहिले) येथपावेतो की, अटळ असलेले मरण आम्हाला आले.’ 48 तर कोणतीही मध्यस्थी त्यांच्यासाठी लाभदायी ठरणार नाही.
49 तेव्हा त्यांना झाले तरी काय की, ते सर्व उपदेशांकडे पाठ फिरवीत आहेत. 50 जणू ते भयभीत झालेली गाढवे होत. 51 जी सिंहाला भिऊन पळत सुटलेली आहेत. 52 किंबहुना, त्यांच्यापैकी प्रत्येकाची अशी इच्छा आहे की, त्याला खुले ग्रंथ दिले जावे. 53 असे कदापि होणार नाही! वस्तुस्थिती ही आहे की, यांना यानंतरच्या जीवनाचे भय नाहीच. 54 निःसंदेह! हा केवळ एक उपदेशग्रन्थ आहे.
55 तेव्हा ज्याची इच्छा असेल, त्याने त्यापासून बोध घ्यावे. 56 पण (सत्य नाकारणारे) यापासून बोध ग्रहण करणार नाहीत, जोपर्यंत त्यांच्याबाबतीत अल्लाह असे इच्छित नाही. तोच यासाठी पात्र आहे की, त्याचे भय बाळगले जावे. आणि लोकांना क्षमा करू शकतो असा तोच आहे.
=================================
अनुवादक -अब्दूर रहमान चाऊस, नांदेड
टिप्पण्या