(The Assembly)(Friday prayer)
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आहे आणि जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतीगान करीत असतात. तो अस्सल सम्राट आहे, सर्व उणिवांपासून मुक्त असा, सर्वशक्तिमान आहे, बुद्धिमान आहे. 2 त्यानेच निरक्षर ( उम्मी) लोकांमध्ये त्यांच्यामधूनच एक पैगंबर उभा केला, जो त्यांना त्याचे ( म्हणजे अल्लाहचे ) संदेश ऐकवीत असतो. आणि ( मानसिकदृष्टया ) त्यांचे शुद्धीकरण करतो. आणि त्यांना ग्रंथ व शहाणपणाचे धडे देत असतो. ते या यापूर्वी स्पष्टरित्या वाट चुकलेले होते. 3 ( मक्केतील निरक्षरांव्यतिरिक्त ) इतर लोकांकडेही ( हा संदेश पोचविण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे ), ते लोक ज्यांचा ( या मक्कावासीयांशी ) अद्याप संबंध आलेला नाही. तोच सर्वशक्तिमान आहे आणि अस्सल बुद्धिवान आहे. 4 ही ( पैगंबरी ) अल्लाहची कृपा होय, तो इच्छितो त्यास, ती प्रदान करतो. अल्लाह असीम कृपावंत आहे.
5 ज्या लोकांच्या ( शिरावर ) तौरात ( या अल्लाहच्या ) ग्रंथाची जबाबदारी सोपवण्यात आली होती , पण त्यांनी ती जबाबदारी ( गंभीरतापूर्वक ) पेलली नाही. त्यांची तुलना त्या गाढवाशी केली जाऊ शकते, जो पुस्तकांचे ओझे वाहून नेत आहे. ( खरोखर,) किती वाईट उपमा आहे, त्या लोकांसाठी ज्यांनी अल्लाहच्या संदेशांना खोटे ठरविले ( त्याकडे वाईटरित्या दुर्लक्ष केले ) ! अल्लाह अशा अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवत नसतो. 6 ( पैगंबर ! ज्यू लोकांना ) सांगा, 'हे ज्यू लोकांनो ! तुम्हाला वाटत असेल की , तुम्ही इतरांपेक्षा अल्लाहला सर्वाधिक प्रिय आहात , आणि तुमच्या या वाटण्यात काही सत्यता असेल तर तुम्ही ( लवकरात लवकर ) मरण्याची अभिलाषा बाळगायला हवी. 7 ' पण ( पैगंबर !) त्यांच्या हातांनी जी (दुष्) कृत्ये आपल्या पुढे पाठवलेली आहेत , त्या कारणामुळे ते कधीही अशी अभिलाषा बाळगणार नाहीत. अल्लाह अपराध्यांना चांगले ओळखून आहे. 8 त्यांना सांगा,' ज्या मृत्यूपासून तुम्ही दूर पळत आहेत, तो तुमच्यावर अटळरित्या येणार आहे. तेव्हा तुम्हाला त्या ( अल्लाह ) समोर हजार केले जाईल, जो ते सर्व जाणतो जिथपर्यंत कोणाचीही बुद्धी पोचू शकत नाही आणि तेही, जे सर्व जाणतात. तेव्हा तो तुम्हाला त्या कामांशी अवगत करेल , जी तुम्ही करीत होता.'
9 इमानधारकांनो ! जेव्हा तुम्हाला ( साप्ताहिक प्रार्थनेकरिता )जमा होण्याच्या दिवशी ( म्हणजे शुक्रवारी ) नमाजासाठी येण्याचे आवाहन केले जाईल, तेव्हा अल्लाहचे ( नमाजरुपी )स्मरण करण्यासाठी सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करून ( प्रार्थनागृहाकडे )निघा. तुम्हाला हे समजणार असेल, तर यात तुमचे स्वतःचे भले आहे. 10 मग जेव्हा नमाज पूर्ण होईल, तेव्हा अल्लाहच्या कृपेच्या शोधार्थ ( त्याच्या जमिनीवर ) ( पाहिजे तिकडे ) पसरून जा. पण अल्लाहची प्रत्येक प्रसंगी आठवण करीत राहा. यासाठी कि, तुम्ही यशस्वी व्हावे.
11 ( पण पैगंबर !) (काही लोकांच्या बाबतीत घटते मात्र याच्या उलट ) जेव्हा त्यांना काही खरेदी-विक्रीचा प्रकार किंवा करमणुकीचा प्रकार होत असल्याचे आढळते तर तुम्ही ( प्रवचन करीत असताना ) तुम्हाला उभे सोडून त्याकडे पळत सुटतात. त्यांना सांगा,'जे अल्लाहपाशी आहे, ते कोणत्याही खरेदी-विक्रीच्या वस्तूपेक्षा व करमणुकीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि अल्लाह सर्वोत्कृष्ट उपजीविका प्रदान करणारा आहे.'
(अब्दूर रहमान चाऊस, नांदेड यांचे मराठीतले भाषांतर )
टिप्पण्या