लुकमान यांचा सत्य वृत्तांत....
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'
14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त कर. (आणि लक्षात ठेव, सर्वांना) माझ्याकडेच परतून यायचे आहे. 15 '(आपल्या आईवडिलांचे नेहमी आदर करीत राहा,) पण जर त्यांनी अशा एखाद्याला माझे समकक्ष ठरविण्यासाठी तुझ्याकडे आग्रह धरला, ज्याचे तुला कोणतेही ज्ञान नाही तर तेव्हा तू त्यांचे म्हणणे (अजिबात) मान्य करू नकोस. (याबाबतीत त्यांच्याशी मतभेद असले तरी ) या जगात त्यांच्याशी पूर्णपणे सहृदयतेने वाग. पण अनुकरण मात्र त्या व्यक्तीचे कर, ज्याने स्वतःला, मला समर्पित करण्याचा मार्ग अंगिकारला आहे. मग शेवटी तुम्हा सर्वांना माझ्याकडेच परत यायचे आहे. तेव्हा मी तुम्हाला तुम्ही काय-काय करीत होता, ते दाखवून देईन.
16 (लुकमान पुढे म्हणाला), ' बेटा ! एखादे कर्म मोहरीच्या दाण्याइतकेही जरी असले आणि ते कोठे खडकात, किंवा आकाशात किंवा जमिनीत कुठेही (कोणाच्याही दृष्टीस न पडण्याच्या अवस्थेत असेल किंवा कोणाच्याही स्मरणात राहिलेले नसेल) तरीही अल्लाह (हिशेब करताना) तेही समोर आणेल. खरोखर, अल्लाह अतिशय तीक्ष्ण नजर ठेवणारा आणि नित्य जागरूक आहे. 17 माझ्या प्रिय मुला ! नित्य नमाजाचे पालन कर, तसेच चांगले कृत्य करण्यास (लोकांना) प्रवृत्त कर आणि वाईट कृत्य करण्यापासून त्यांना प्रतिबंध कर. तसेच (या जीवनात) जो काही त्रास तुला पोहोचेल, ते सहन करीत राहा. खरोखर, ही धैर्याची कामे आहेत. 18 तसेच लोकांकडे घमेंडीने तोंड वाकडे करू नकोस आणि भूतलावर ऐट मिरवीत चालू नकोस. कारण (नेहमी लक्षात ठेव) अल्लाहला ऐटबाज व गर्विष्ठ लोक (अजिबात) प्रिय नाहीत. 19 तसेच आपल्या वर्तणुकीत शालीनता कायम ठेव आणि (कोणाशीही बोलताना) मृदू आवाजात बोल, (लक्षात असू दे की,) सर्वात वाईट (कर्णकटू) आवाज गाढवाचा आवाज आहे.'
[कुरआन 31:12-19]
============================
टिप्पण्या