82 अल -इनफितार (The Shattering)
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जेव्हा आकाश फाटून जाईल. 2 आणि जेव्हा तारे विखुरुन जातील. 3 आणि जेव्हा (महाभयानक सुनामीप्रमाणे) समुद्र वाहू लागतील. 4 आणि जेव्हा कबरी उघडल्या जातील. 5 प्रत्येकाला कळून येईल की, त्याने (स्वतःसाठी) पुढे काय पाठविले आहे. आणि मागे काय सोडले आहे. 6 हे मानवा ! आपल्या कृपावंत पालनकर्त्याविषयी तुझी कोणत्या गोष्टीने फसवणूक केली आहे?
7 ज्याने तुला निर्माण केले, मग तुझ्या शरीरातील अवयवांची संतुलित अशी रचना करून तुला घडविले.
8 ज्या रूपात इच्छिले तसे तुला रूप दिले. 9 तरीही (लोकांनो!) तुम्ही न्यायाच्या दिवसाला खोटे समजता! 10 पण सत्य हे आहे की, तुमच्यावर पहारेकरी नियुक्त आहेत (जे न्यायाच्या दिवशी तुमच्याविषयी साक्ष देतील). 11 ते (खरोखर) सन्मानास पात्र आहेत, ते (तुमच्या प्रत्येक कृत्याची काळजीपूर्वक ) नोंद करीत आहेत. 12 तुम्ही जे काही करता, ते सर्व जाणतात. 13 निःसंदेह, सदाचारी लोक सर्वसुखसंपन्न (अशा स्वर्गात) असतील. 14 तर याउलट दुराचारी लोक नरकात असतील. 15 न्यायाच्या दिवशी त्यात प्रवेश करतील. 16 आणि तिथून त्यांची कदापि सुटका होणे नाही. 17 तुम्हाला काय माहीत की, न्यायाचा दिवस काय चीज आहे? 18 पुन्हा ऐका, न्यायाचा दिवस काय आहे, याची तुम्हाला किती जाणीव आहे? 19 त्या दिवशी कोणीही कोणासाठीही काही करू शकणार नाही (कोणत्याही प्रकारे कामी येणार नाही). त्या दिवशी सर्वप्रकारचे अधिकार फक्त आणि फक्त एकट्या अल्लाहकडे असतील.
==================================
टिप्पण्या