65 अत- तलाक
* आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 पैगंबर ! जेव्हा तुमच्यापैकी कोणीही आपल्या पत्नींना घटस्फोट (तलाक) देईल तर (त्याने) त्यांना त्यांच्या स्वच्छतेच्या (म्हणजे मासिक पाळी नसलेल्या) काळात तलाक द्यावा. आणि त्या काळाची गणना काळजीपूर्वक करा. आणि आपला पालनकर्ता असलेल्या अल्लाहसमोर (जाब देण्याची सदैव) जाण ठेवा. (तलाकची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) त्यांना त्यांच्या घरातून काढू नका. तसेच त्यांनीही घर सोडून जाऊ नये. पण फक्त त्यांनी जर उघड-उघड काही निर्लज्जपणाचे कृत्य केलेले असेल (तर त्यांना घराबाहेर घालवू शकता). या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत आणि जो कोणी अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा भंग करेल, तर तो स्वतःवरच अन्याय करणारा आहे. (हे माणसा!) तू जाणत नाहीस की, अल्लाह त्यानंतर कदाचित काही नवीन (कल्याणकारी) स्थिती निर्माण करेल. 2 मग त्यांच्या प्रतीक्षेची मुदत पूर्ण झाल्यांनंतर, त्यांना सन्मानाने ठेवून घ्या किंवा सन्मानाने सोडून द्या. आणि आपल्या (नातेवाईकांपैकी) दोन विश्वसनीय लोकांना साक्ष म्हणून बोलावून घ्या. (आणि साक्ष देणाऱ्यांनी गरज असेल तेव्हा) अल्लाहची जाण ठेवून, योग्य तीच साक्ष द्यावी. हे उपदेश त्या माणसाला दिले जात आहेत, जो अल्लाहवर व न्यायाच्या दिवसावर विश्वास ठेवणारा आहे. आणि जो कोणी अल्लाहकडे (जाब देण्याची) जाण ठेवेल, अल्लाह त्याच्यासाठी (अडचणीतून) बाहेर पाडण्याचा मार्ग काढेल. 3 आणि तो त्याला अशा ठिकाणाहून उपजीविका पुरवेल, ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसेल. जो कोणी अल्लाहवर विश्वास ठेवतो, अल्लाह त्याच्यासाठी पर्याप्त आहे. अल्लाह नेहमी आपली योजना तडीस नेतोच. (आणि) अल्लाहने प्रत्येक गोष्टीसाठी एक (अवधी व) प्रमाण ठरवून दिलेले आहे.
4 आणि तुमच्या स्त्रियांपैकी वय झाल्यामुळे ज्यांना मासिक पाळी येण्याविषयी शंका आहे. तर अशा स्त्रियांसाठी प्रतिक्षेची अवधी तीन महिने आहे आणि हाच नियम त्यांनाही लागू होईल ज्यांना मासिक पाळी आलेलीच नाही. आणि गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी प्रतिक्षेचा काळ प्रसूती होईपर्यंत आहे. आणि जो कोणी अल्लाहकडे (जाब देण्याची) जाण ठेवेल, अल्लाह त्याचे काम सोपे करून टाकेल. हा आहे अल्लाहचा आदेश, जो त्याने तुमच्याकडे प्रकट केलेला आहे. जो कोणी अल्लाहची जाण बाळगून (जीवन जगेल), अल्लाह त्याच्या चुका माफ करून टाकेल आणि त्यास फार मोठे बक्षीस प्रदान करेल.
6 ज्या स्त्रिया (प्रतिक्षेच्या काळात) आहेत. त्यांना आपल्या ऐपतीनुसार जसे तुम्ही राहत आहात, तसेच त्यांनाही तिथेच राहू द्या. आणि त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांचा छळ करू नका. आणि त्या जर गर्भवती असतील, तर बाळ जन्माला येईपर्यन्त खर्च करा. मग जर (तलाक झाल्यानंतरही) त्या तुमच्या (बाळाला) स्तनपान देत असतील, तर त्यांना त्याबद्दल योग्य तो मोबदला द्या. (मुलाच्या भविष्याविषयी) आपसात सामंजस्यपूर्वक विचारविमर्श करा. आणि जर तुम्ही आपसात असहमत असाल, तर मग इतर एखादी स्त्री तुमच्या बाळाला दूध पाजील .(या सर्व बाबतीत) ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती आहे, त्याने त्यानुसार खर्च करावा. आणि ज्याच्याकडे निर्वाहाची साधने कमी प्रमाणात आहेत त्याने, अल्लाहने त्याला जे काही दिलेले आहे त्यानुसार त्यातून खर्च करावा. अल्लाहने ज्याला जितके दिलेले आहे, त्यापेक्षा अधिक भर तो कोणावरही टाकत नसतो. अल्लाह हलाखीच्या(दिवसांनंतर)लवकरच चांगले दिवसही आणेल.
8 कित्येक अशा वस्त्या होत्या, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या व त्याच्या पैगंबराच्या आग्यांचे उल्लंघन केले, तेव्हा आम्ही त्यांना कठोरपणे फैलावर घेतले. आणि आम्ही त्यांना कठोर शिक्षा केली. 9 अशाप्रकारे त्यांनी आपल्या (कर्मरूपी) कमाईचीफळे चाखली आणि शेवटी विनाशाशिवाय त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. 10 (यापलीकडेही )अल्लाहने त्यांच्यासाठी (याहूनही) मोठी शिक्षा तयार ठेवलेली आहे. हे बुद्धी बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनो! अल्लाहची जाण बाळगून असा. अल्लाहने तुमच्याकडे एक बोधग्रंथ प्रकट केलेला आहे. 11 (आणि ) एक पैगंबर (पाठविला आहे), जो तुम्हाला अल्लाहचे सुस्पष्ट संदेश ऐकवीत आहे. यासाठी की, जे श्रद्धा धारण करून सत्कर्मे करीत आहेत, अशा लोकांना अंधकारातून काढून प्रकाशात आणावे. आणि जो कोणी अल्लाहवर श्रद्धा धारण करून सत्कर्मे करतो, तो त्यास अशा बागांत प्रवेश देईल, ज्यातून पाण्याचे (नयनरम्य ) प्रवाह (कायम) वाहत असतील. ते तिथे कायम वास्तव्य करतील. ही अल्लाहने त्याला प्रदान केलेली उत्कृष्ट उपजीविका असेल. तो अल्लाह आहे, ज्याने सात आकाशांना निर्माण केले व तशाच पृथ्वी देखील. त्यांच्यामध्ये त्याचे आदेश प्रकट होत असतात (आणि त्या आदेशांनुसार हा प्रचंड कारखाना काम करीत असतो) ते यासाठी की, तुम्हाला कळून यावे की, प्रत्येक गोष्टीवर अल्लाहचे पूर्ण नियंत्रण आहे. आणि अल्लाहने आपल्या ज्ञानाने प्रत्येक गोष्टीस वेढून ठेवलेले आहे.
(अब्दूर रहमान चाऊस, नांदेड यांचे मराठीतले भाषांतर )
टिप्पण्या