73 अल - मुज्जम्मिल
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 स्वतःवर चादर पांघरून असलेल्या (हे पैगंबर!) 2 रात्रीच्या समयी (नमाजामध्ये अल्लाहसमोर) उभे राहा, रात्रीचा काही भाग. 3 (म्हणजे) रात्रीचा अर्धा भाग किंवा त्यापेक्षा काही कमी. 4 किंवा त्यापेक्षा थोडासा अधिक. कुराणाचे पठण करताना, सावकाश पण विचारपूर्वक (पठण) करा. 5 आम्ही तुमच्यावर (आमचे संदेश पोचविण्याचे) फार मोठे दायित्व सोपवीत आहोत (तर त्यासाठी तुम्ही तयार असा.) 6 निश्चितच, रात्रीच्या समयी (प्रार्थनेसाठी) उठणे कठीण (असले तरी) स्वतःच्या मनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. आणि तेव्हा (प्रार्थनाही) मनापासून (माणूस) करू शकतो.
7 कारण दिवसा तुम्हाला (संदेश पोचविण्याच्या जबाबदारी संबंधाने) बरीच कामे असतात. 8 (दिवस असो वा रात्र) आपल्या पालनकर्त्याच्या नावाचे (प्रत्येक प्रसंगी) स्मरण करीत राहा आणि संपूर्ण निष्ठेने त्याच्याप्रती समर्पित असा. 9 तो पूर्व आणि पश्चिम यांचा (म्हणजे संपूर्ण जगाचा) मालक आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणीच उपासनेयोग्य नाही. म्हणून त्यालाच तुम्ही आपला साम्भाळकर्ता बनवा. 10 आणि लोक जे काही म्हणतात, त्याबद्दल सहनशीलता बाळगा आणि सभ्यपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. 11 आणि सुख-समृद्धी लाभलेल्या, सत्य नाकारणाऱ्या लोकांना माझ्यावर सोडा (मी त्यांना हाताळेन), (पण) त्यांना काही काळ उसंत द्या.12 (अशांसाठी) आमच्याकडे अवजड बेड्या व धगधगती आग आहे. 13 आणि घशात अडकेल असे भोजन आहे आणि दुःखदायी शिक्षा आहे. 14 ज्या दिवशी जमीन व पर्वत कम्प पावतील, आणि पर्वत वाळूच्या विखुरणाऱ्या ढिगाऱ्यांप्रमाणे होतील.
15 (लोकांनो!) आम्ही तुमच्याकडे एका पैगंबराला पाठविले आहे. जो तुमच्यासमोर सत्याची साक्ष देणारा आहे. ज्याप्रमाणे आम्ही फिरऔनकडेही एका पैगंबराला पाठविले होते. 16 पण फिरऔनने पैगंबराचे म्हणणे मान्य केले नाही, परिणामी आम्ही कठोरतापूर्वक त्याच्या मुसक्या आवळल्या. 17 त्याचप्रमाणे जर तुम्हीही सत्य नाकाराल, तर त्या दिवसाच्या शिक्षेपासून तुम्ही स्वतःला कसे वाचवाल? ज्या दिवसाच्या (दहशतीने) मुलेही वृद्ध होऊन जातील. 18 ज्या दिवशी आकाश फाटेल, कारण अल्लाहचे (पुनरुत्थानाचे) वाचन पूर्ण होणार. 19 (हे कुराण) एक उपदेशग्रंथ आहे, तेव्हा हवे त्याने आपल्या पालनकर्त्याचा मार्ग निवडावा. 20 (पैगंबर!) तुमच्या पालनकर्त्याला चांगले ठाऊक आहे की , तुम्ही व तुमचे अनुसरण करणारे (श्रद्धावंत) त्याच्यासमोर प्रार्थनेत (कधी जवळजवळ) दोन तृतीयांश किंवा एक द्वितियांश तर कधी एक तृतीयांश रात्र उभे असता. अल्लाह रात्र व दिवसाच्या अवधीचे प्रमाण निश्चित करीत असतो. त्याला माहित आहे की, तुम्ही वेळेचे प्रमाण निश्चित करू शकत नाही, म्हणून त्याने तुमच्यावर दया केली (आणि वेळेचा निर्बंध ठेवला नाही). तेव्हा तुम्ही तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे (रात्रीच्या प्रार्थनेत) कुराणाचे पठण करा. त्याला माहीत आहे की, तुमच्यात काही आजारी असतात, तर काही अल्लाहच्या कृपेच्या (म्हणजे उपजीविकेच्या) शोधार्थ प्रवासात असतात. आणि काही (वेळप्रसंगी) अल्लाहच्या कार्यासाठी लढत असतात. म्हणून कुराणातील तुम्हाला सहज शक्य होईल तेवढ्या भागाचे पठण करा. तसेच नित्य प्रार्थना करा, दानकार्य करा आणि (जकातीशिवाय शक्य असेल, तर) अल्लाहला उदरतापूर्वक कर्ज द्या. जी चांगले कृत्ये तुम्ही स्वतःसाठी पुढे पाठवाल, ती तुम्हाला अल्लाहपाशी आढळतील. तर हेच (तुमच्यासाठी) अधिक उत्तम असेल आणि त्यांचा मोबदलाही फार मोठा असेल. आणि अल्लाहकडे क्षमायाचना करा. खरोखर तो फार क्षमाशील व दयाळू आहे.
-----------------------------------------------------
अनुवादक-अब्दुर -रहमान चाऊस, नांदेड
टिप्पण्या