🔥chapter 75 अल कियामह 🔥
🔥🔥🔥(The Resurrection)🔥🔥🔥
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 मी पुनरुत्थानाच्या दिवसाला साक्षी ठेवून सांगतो. 2 तसेच ( मानवाचे ) मन , जे ( वाईट कामांविषयी ) त्याला दोष देत असते, त्यास साक्ष ठेवून सांगतो. 3 मानवाला असे वाटते कि काय, आम्ही त्याची हाडे पुन्हा एकत्र करून त्याचे ( पुनरुत्थान ) करू शकत नाही ? 4 अर्थातच, आम्हाला त्याच्या बोटांची पेर अन पेर ( जशाचे तसे ) बसवण्याचे सामर्थ्य प्राप्त आहे. 5 पण माणूस त्याच्यापुढे, जे येणार आहे त्यास नाकारू इच्छितो ( म्हणजेच पुनरुत्थानास, कारण त्याला निर्भयपणे दुष्कृत्ये करता यावीत ). 6 ( चेष्टा करत ) तो विचारतो, ' तो पुनरूत्थानाचा दिवस येणार तरी केव्हा ? 7 जेव्हा ( दहशतीने ) डोळे दिपून जातील. 8 आणि चंद्राला ग्रहण लागेल. 9 जेव्हा सूर्य व चंद्र एकत्र आणले जातील.10 त्या दिवशी मनुष्य म्हणेल, ' आता कुठे पळून जाऊ ?' 11 नाही, ( हे मानवा !) तुझ्यासाठी आता कुठेही आश्रय नाही ! 12 त्या दिवशी केवळ तुझ्या पालनकर्त्यापाशीच आश्रयस्थान आहे ! 13 त्या दिवशी मनुष्यासमोर त्याने जे काही आपल्यापुढे पाठविलेले असेल , आणि जे काही मागे सोडलेले असेल , ते सर्व उघड केले जाईल. 14 वस्तुस्थिती ही आहे की , मनुष्य स्वतः आपल्याविरुद्ध साक्ष आहे.
15 मग तो कितीका सबबी पुढे ठेवत नाही ?
16 ( पैगंबर !) तुम्ही ( हे कुराण ) तुम्हाला लवकर पाठ होऊन जावे म्हणून घाईघाईने आपल्या जिभेला चालना देऊन नका. 17 कारण त्यास ( तुमच्या मनात ) संकलित करण्याची व पठण करवण्याची जबाबदारी निश्चितपणे आमच्यावर आहे. 18 जेव्हा आम्ही तुम्हाला वाचून ऐकवू, तेव्हा तुम्ही त्याच्या शब्दांचे लक्षपूर्वक अनुसरण करा. 19 त्याचे अर्थ स्पष्ट करणे आमचेच काम आहे.
20 नाही , पण तुमच्यापैकी ( अनेकांना ) ताबडतोब होणार फायदाच प्रिय असतो ( म्हणजेच याच जगात सर्व काही मिळावे.) 21 आणि यानंतरच्या जीवनाकडे दुर्लक्ष करता. 22 काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लित असतील. 23 आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील. 24 आणि त्या दिवशी काही चेहऱ्यांवर उदासीनता पसरलेली असेल. 25 या विचारात असतील की, त्यांच्यावर फार मोठं दुःखाचे संकट लवकरच कोसळणार आहे. 26 पण जेव्हा ( मरणाऱ्या ) माणसाचा ( शेवटचा श्वास ) कंठाशी येतो. आणि ( त्याच्या आसपासचे ) लोक म्हणतात, ' कोणी मांत्रिक आहे का, जो त्याला वाचवू शकतो ? 28 आणि त्याला खात्री होते की, हीच या जगाला निरोप देण्याची वेळ आहे. 29 मृत्यू होताना होणाऱ्या तीव्र वेदनेमुळे, एक पाय दुसऱ्या पायावर घासू लागेल. ( हे मानवा !) हा दिवस असेल तुझ्या पालनकर्त्याकडे प्रयाण करण्याचा !
31 (जोपर्यंत तो जिवंत होता ) ना त्याने सत्याचा स्वीकार केला, ना त्याने नमाजरुपी प्रार्थना केली. 32 या उलट, त्याने सत्यास खोटे ठरविले आणि त्याकडे पाठ दाखविली. 33 मग तो ( उपदेशगृहातून ) उठून मोठ्या ऐटीने आपल्या कुटुंबीयांकडे निघून जायचा. 34 ( हे मानवा ! ) खेद आहे तुझ्याबद्दल , फक्त खेद ! 36 मनुष्याला असे वाटते की काय, त्यास ( वाटेल ते करण्यासाठी ) असेच सोडून देण्यात येईल ? ( म्हणजे त्याच्याशी जाब विचारला जाणार नाही ?) 37 प्रथमतः तो गर्भाशयात टाकला गेलेला वीर्याचा एक बिंदू नव्हता का ? 38 वीर्यापासून पुढे तो गुठळी झाला, मग अल्लाहने त्यास घडविले व पूर्ण संतुलनासह त्याच्या अवयवांची रचना केली. 39 आणि त्याचे दोन प्रकार बनविले, म्हणजे नर व नारी. त्याचा ( निर्माता असलेला अल्लाह ) मृताला जिवंत करण्यास समर्थ नसेल का ?
(अब्दूर रहमान चाऊस, नांदेड यांचे मराठीतले भाषांतर ).
टिप्पण्या