मुख्य सामग्रीवर वगळा

64 अत तगाबुन️ (Mutual loss and gain)


*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आणि जे काही  पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतिगान करीत असतात. सर्वत्र त्याचीच सत्ता आहे -- व सर्वत्र त्याचीच स्तुती आहे. आणि सर्व वस्तुमात्रांवर त्यालाच पूर्ण नियंत्रण प्राप्त आहे. 2 त्यानेच तुम्हा (सर्वांना) निर्माण केले, मग तुमच्यात काही सत्य नाकारणारे तर काही सत्य स्वीकारणारे (श्रद्धावंत) आहेत. तुम्ही जे काही करता, त्यावर अल्लाह (नेहमी)नजर ठेवून असतो. 3 त्यानेच आकाश व पृथ्वी यांना उचित उद्देशासहित निर्माण केलेले आहे. आणि त्याने तुम्हाला आकार दिला , उत्तम आकार दिला. आणि त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परत जायचे आहे. 4 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व तो जाणतो. तसेच तो तुम्ही जे लपवता व जे प्रकट करता तेही जाणतो. कारण अल्लाहलाच (लोकांच्या) मनात काय काय आहे, याचे पूर्ण ज्ञान आहे.

5 तुम्हाला त्या लोकांची जाणीव झाली नाही का, ज्यांनी यापूर्वी सत्य नाकारण्याचे (अपकृत्य) केले ? मग आपल्या कर्मांची फळे चाखली . आणि (यानंतरच्या जीवनात) तर त्यांच्यासाठी (याहूनही) कठोर शिक्षा आहे. 6 असे (पुन्हा-पुन्हा) यासाठी  (घडले), कारण त्यांच्याकडे त्यांचे पैगंबर सत्याचे सर्व स्पष्ट प्रमाण घेऊन आले .पण (पैगंबराप्रति नेहमी) त्यांचा प्रतिसाद असाच होता की, ही (आमच्यासारखी असलेली) माणसे आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत? अशाप्रकारे त्यांनी सत्यास नकार दिला आणि त्याकडे पाठ फिरवली. आणि अल्लाहला अशा लोकांची गरज नाही. तो (खराखुरा) आत्मनिर्भर आहे. सर्व प्रकारच्या स्तुतीस (सदैव) पात्र असा.

7 सत्य नाकारणारे असा दावा करतात की, त्यांना पुन्हा जिवंत करून उठविले जाणे शक्यच नाही. (पैगंबर !) त्यांना सांगा, 'माझ्या पालनकर्त्याची शपथ, तुम्हाला पुन्हा जिवंत करून अवश्य उठविले जाईल, मग तुम्हाला तुम्ही जे- जे करत होता, त्याचे दर्शन घडविले जाईल. ही अल्लाहसाठी अगदी सोपी गोष्ट आहे. 8 म्हणून (लोकांनो!) अल्लाहवर व त्याच्या पैगंबरावर आणि जो सन्मार्ग दाखवणारा प्रकाश आम्ही प्रकट केला आहे. त्यावर  विश्वास  ठेवणारे बना. आणि तुम्ही जे काही करता, त्याची अल्लाहला पूर्ण जाणीव आहे.  9 जेव्हा तो तुम्हाला त्या एकत्र करण्याच्या दिवशी एकत्रित करेल . हाच दिवस (खऱ्या अर्थाने) जय व पराजयाचा दिवस असेल. जो कोणी श्रद्धा धारण करून सत्कर्मे केलेला असेल, अल्लाह अशा माणसाची वाईट कृत्ये माफ करून टाकेल. आणि त्यास अशा बागांत प्रवेश देईल, जिथे पाण्याचे ( नयनरम्य ) प्रवाह (नेहमी) वाहत असतील. (असे लोक ) तिथे कायम वास्तव्य करतील. हेच आहे अस्सल यश. 10 ज्या लोकांनी सत्य स्वीकारण्यास नकार दिला आणि आमच्या संदेशांना खोटे ठरविले, असेच लोक नरकवासी असतील. ते  तिथे कायम वास्तव्य करतील. हेच सर्वात वाईट ठिकाण आहे (राहण्याचे !)

11 (लोकांनो!) तुमच्यावर कोणतीही आपत्ती अल्लाहच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. आणि जो कोणी अल्लाहवर दृढ विश्वास ठेवतो, अल्लाह त्याच्या अंतःकरणास योग्य मार्ग दाखवतो. अल्लाहला प्रत्येक गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान आहे. 12 तुम्ही  अल्लाहचे आज्ञापालन करा व पैगंबराचे आज्ञापालन करा. मग जर तुम्ही (या संदेशाकडे) दुर्लक्ष कराल तर आमच्या पैगंबरावर (संदेश)  स्पष्टपणे पोहोचविण्यापलीकडे अन्य जबाबदारी नाही. 13 अल्लाह--त्याच्याशिवाय दुसरा कोणीच उपासनेयोग्य नाही. आणि विश्वास ठेवणाऱ्यांना त्याच्यावरच विश्वास ठेवायला हवा.

14 श्रद्धावंतांनो ! तुमच्या पत्नी व तुमची मुले यांच्यापैकी काही (धर्माच्या बाबतीत) तुमचे शत्रू आहेत. तर तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा. पण जर तुम्ही त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष कराल आणि त्यांच्याप्रति दया दाखवाल व त्यांना माफ कराल, तर अल्लाह (देखील) फार क्षमा करणारा व दया करणारा आहे. 15 (लोकांनो !) तुमची धनसंपत्ती  व तुमची अपत्ये या गोष्टी तुमची कसोटी पाहण्याचे साधन आहे आणि (माणसाला जे-जे हवे, ते खऱ्या अर्थाने ) अल्लाहकडेच प्राप्त होणार आहे. 16 तर (श्रद्धावंतांनो !) नेहमी अल्लाहचा जाण  ठेवून (जीवन व्यतीत करण्यासाठी ) प्रयत्नशील राहा. (जे सांगितले जाते ते ) ऐका व आग्येचे पालन करा. व (त्याच्या कार्यासाठी) खर्च करा. यात तुमचे स्वतःचे भले आहे. जे लोक कृपनतेच्या (लालसेच्या) आहारी जाण्यापासून सुरक्षित राहिले. तर असेच लोक यशस्वी ठरणारे आहेत. 17 जर तुम्ही अल्लाहला उदारतापूर्ण कर्ज द्याल तर तो त्यात तुमच्यासाठी कित्येक पटीने वाढ करेल.आणि तो तुमच्या चुका माफ करेल. कारण अल्लाह  हा (आपल्या दासांप्रति) फार गुणग्राहक आहे व फार सहिष्णू आहे.

18 तो ते सर्व जाणतो, जिथपर्यंत कोणाचीही बुद्धी पोचू शकत नाही आणि तेही, जे सर्व जाणतात. तोच सर्वशक्तीमान व खरा  बुद्धिवान आहे.

(अब्दूर रहमान चाऊस, नांदेड यांचे मराठीतले भाषांतर )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...