मुख्य सामग्रीवर वगळा

76 अद-दहर (अल इंसान)(Man)

76 अद-दहर
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.           
1 मनुष्यावर एक अशी वेळ आलेली नाही का, जेव्हा तो वर्णन करण्यास योग्य असा नव्हता? 2 आम्ही मनुष्याला एक मिश्रित अशा वीर्यबिंदूने निर्माण केले. आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी आम्ही त्याला ऐकणारा व पाहणारा बनविले. 3 आम्हीच त्याला मार्ग दाखवला आहे. आता स्वतःला कृतज्ञ किंवा कृतघ्न त्याला सिद्ध करून दाखवायचे आहे. 4 आम्ही सत्य नाकारणाऱ्या कृतघ्न लोकांसाठी साखळदंड, गळ्यात घालावयाची लोखंडी कडी आणि नरकाची धगधगती आग तयार ठेवलेली आहे. 5 याउलट सच्चे सदाचरणी लोक असे प्याले पितील, ज्यात कापूराचा  थंडावा जाणवेल. 6 हा एक असा स्रोत आहे, ज्यातून अल्लाहचे भक्त पितील. आणि हवे तिकडे (त्याच्या शाखा काढून) त्यास प्रवाहित करतील. 7 (खरे सदाचरणी ते आहेत,) जे आपल्या वचनपूर्तीच्या बाबतीत फार दक्ष असतात. आणि त्या दिवसाचे भय बाळगतात, ज्याचे संकट सर्वदूर पसरलेले असेल. 8 आणि ते ( केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी ) स्वतः गरजवंत असूनही (इतर) गरजवंत, अनाथ व कैदी यांना खाऊ घालतात. 9 (म्हणतात) 'आम्ही केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी तुम्हाला खाऊ घालत असतो. आम्हाला तुमच्याकडून ना काही मोबदला हवा आहे, ना तुमचे आभार. 10 त्या भयानक दिवशी आमच्या पालनकर्त्याकडून होणाऱ्या निर्णयाचे आम्हाला भय वाटते.' 11 आणि म्हणून अल्लाह त्या दिवसाच्या संकटापासून त्यांचे रक्षण करेल. आणि त्यांना चैतन्य व सुख प्रदान करेल. 12 आणि त्यांच्या सहनशीलतेच्या मोबदल्यात त्यांना स्वर्ग व रेशमी कपडे प्रदान करेल. 13 ते तिथे भव्य आसनांवर लोड लावून पहुडलेले असतील. तिथे त्यांना ना उन्हाळ्याचा त्रास होईल, ना हिवाळ्याचा. 14 स्वर्गातील वृक्षांच्या आनंददायी सावल्या त्यांच्यावर पसरलेल्या असतील आणि फळांचे गुच्छ हाताला सहज येतील (अशा पद्धतीने तिथे उपलब्ध असतील). 15 (ईश्वरीय प्रसादांनी भरलेली) चांदीची पात्रे व काचेचे प्याले त्यांच्यादरम्यान फिरविले जातील. 16 काचेसारखे दिसणारे प्याले, चांदीचेच असतील. योग्य प्रमाणात ते भरलेले असतील. 
17 (याशिवाय) त्यांना तिथे सुंठीचे फ्लेव्हर असलेले (मद्याचे) प्याले पिण्यास देण्यात येतील. 18 स्वर्गात (अशा पेयाचा) एक वाहता झरा आहे, ज्याचे नाव सल्सबील आहे. आणि त्यांच्या सेवेत अशी (सुंदर) मुले नेहमी तत्पर असतील, जे नेहमी तशीच मुले राहतील. तुम्ही त्यांना पाहाल, तर तुम्हाला वाटेल की, ते सर्वत्र विखुरलेले जणू मोतीच आहेत. 20 स्वर्गात तुम्ही जिथे-कुठे पाहाल सर्वत्र तुम्हाला सुख समृद्धी आणि महान राजेशाही थाट दिसून येईल. 21 स्वर्गनिवासी तिथे तलम  हिरव्या रेशमाची कपडे परिधान करतील आणि कशिदा काढलेली वस्त्रे. आणि त्यांना चांदीची कडी घालण्यात येतील आणि त्यांचा पालनकर्ता त्यांना शुद्ध पेय पिण्यासाठी देईल. 22 (त्यांना सांगितले जाईल) 'हा तुमचा मोबदला आहे. आणि तुमच्या प्रयत्नांना (अल्लाहची) स्वीकृती मिळाली आहे.'
23 (पैगंबर!) आम्ही (हे) कुराण तुमच्याकडे थोडे-थोडे करून प्रकट केलेले आहे. 24 म्हणून तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची संयमपूर्वक प्रतीक्षा करा. आणि त्यांच्यापैकी कोणाचेही म्हणणे मान्य करू नका, जो पापी व कृतघ्न आहे. 25 आणि सकाळी व संध्याकाळी (वेगवेगळ्या प्रसंगी) आपल्या पालनकर्त्याचे स्तुतिगान करा. 26 आणि रात्रीच्या समयीदेखील त्याच्यासमोर (नमाजात) नतमस्तक व्हा. आणि रात्रीच्या एका मोठ्या भागात त्याचे स्तुतिगान करा. 27 हे लोक (जे अल्लाहविषयी गाफील आहेत), ताबडतोब प्राप्त होणाऱ्या फायद्यांची अभिलाषा बाळगतात. आणि (त्यांच्याशी अटळरित्या सामना होणाऱ्या) भयंकर दिवसाकडे, ते दुर्लक्ष करून आहेत. 28 आम्हीच त्यांना निर्माण केलेले आहे. आणि त्यांच्या अवयवांची सुदृढ अशी रचना आम्हीच केलेली आहे. आणि आम्ही इच्छिले तर त्यांच्याजागी त्यांच्याचसारख्या इतरांना आणू शकतो. 29 हा एक उपदेशग्रन्थ आहे. तेव्हा ज्याची इच्छा असेल, त्याने आपल्या पालनकर्त्याकडे जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा. 30 पण तोपर्यंत अल्लाह (तुम्हाला तो मार्ग दाखवू) इच्छित नाही, तोपर्यंत तुम्हीही तशी इच्छा करू शकत नाही. अल्लाह सर्व काही जाणणारा आहे, बुद्धिमान आहे. 31 तो इच्छितो त्यास आपल्या कृपाछ्त्रात प्रवेश देतो. आणि अत्याचारी लोकांसाठी त्याने कठोर शिक्षा तयार ठेवलेली आहे. 
----------------------------------------------------------------------------
अनुवादक-अब्दुर-रहमान चाऊस,     












 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...