78 अन-नबा
*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 लोक आपसात कोणत्या गोष्टीविषयी विचारणा करीत आहेत? 2 (पुरुत्थानाच्या) त्या महाभयानक गोष्टीविषयी? 3 ज्याबद्दल ते मतभेद बाळगून आहेत. 4 पण त्यांना लवकरच कळून येईल. 5 होय! त्यांना लवकरच कळून चुकेल. 6 आम्ही पृथ्वीला ( मानवजातीसाठी ) विश्रांतीचे स्थान नाही बनविले? 7 आणि पर्वतांना आधारस्तंभाप्रमाणे (नाही बनविले का )? 8 आणि आम्ही तुम्हाला जोड्या-जोड्यांच्या स्वरूपात निर्माण केले आहे. 9 आणि झोपेला तुमचा थकवा दूर करण्याचे साधन बनवले. 10 आणि रात्रीला आम्ही आवरण बनविले. 11 आणि दिवसाला जीवनप्रवास पुढे सुरु ठेवण्याचे माध्यम बनविले. 12 आणि आम्ही तुमच्यावर सात भक्कम आकाश निर्माण केले. 13 आणि ( आकाशात सूर्यरूपी) एक दीपक स्थापित केले. 14 आणि आम्ही वारे हाकून नेणाऱ्या जड ढगांतून विपुल प्रमाणात पाण्याचा वर्षाव करतो. 15 त्याद्वारे धान्य व वनस्पती आम्ही निर्माण करतो. 16 आणि घनदाट बागबगीचेही. 17 न्यायाच्या दिवसाची वेळ ठरलेली आहे, यात मुळीच शंका नाही.
18 ज्या दिवशी शिंग फुंकले जाईल आणि तुमचे ताफेचं ताफे येऊ लागतील. 19 आणि आकाश उघडण्यात येईल, त्यामध्ये दरवाजेच दरवाजे होऊन जातील. 20 आणि पर्वतांना चालविले जाईल, तर ते असे होऊन जातील की, जणू काही ते मृगजळच होते. 21 निःसंदेह, (सत्य नाकारणाऱ्या लोकांसाठी) नरक टपून बसलेला आहे. 22 विद्रोही लोकांचे ते ठिकाण आहे. 23 त्यात ते युगानुयुगे पडून राहतील.24 तिथे त्यांना ना थंडाव्याचा स्पर्श होईल, ना ( तहान भागवणारे) काही प्यायला मिळेल. 25 आणि मिळेल तर केवळ उकळते पाणी आणि पू . 26 ( असा असेल ) त्यांच्या दुष्कृत्यांचा योग्य तोच मोबदला. 27 कारण ते ( मृत्यूनंतरच्या जगात) 'हिशेब घेतला जाणार' अशी जाण बाळगून नव्हते. 28 आणि त्यांनी आमच्या प्रत्येक संदेशाला जाणूनबुजून खोटे ठरविले. पण आम्ही ( त्यांनी केलेले ) प्रत्येक (कृत्य) रेकॉर्ड करून ठेवलेले आहे. 30 ( आणि आम्ही त्यांना सांगू,) '(आपल्या दुष्कृत्यांची) फळे आता चाखा , कारण आम्ही तुमच्या शिक्षेत केवळ वाढ आणि वाढ करीत जाऊ .'
31 ( पण) अल्लाहची जाण ठेवून असलेल्या लोकांसाठी यश नक्की आहे. 32 भव्य बागा आणि द्राक्षांच्या वेली. 33 आणि समवयस्क नवयुवती. 34 आणि काठोकाठ भरलेले प्याले. 35 तिथे ते व्यर्थ व खोट्या गोष्टी कधीही ऐकणार नाहीत. 36 हे असेल तुमच्या पालनकर्त्याकडून ( त्यांच्या कृत्यांनुसार) मिळालेले बक्षीस. 37 त्या कृपावंत अल्लाहकडून, जो आकाश व पृथ्वी आणि त्या दोहोंच्यामध्ये जे - जे आहे, त्या सर्वांचा पालनकर्ता आहे. त्याच्यासमोर ( काही ) बोलण्याची कोणीही हिम्मत करून शकत नाही. 38 ज्या दिवशी (म्हणजेच न्यायाच्या दिवशी ) जिब्रील व इतर स्वर्गदूत पंक्तिबद्ध (त्यांच्यासमोर) उभे राहतील. कोणीही काही बोलणार नाही. पण तो बोलेल, ज्याला कृपावंत अल्लाह बोलण्याची परवानगी देईल. आणि तो योग्य तेच बोलेल. 39 तो दिवस येणे अटळ आहे. तेव्हा ज्याला आपल्या पालनकर्त्याकडे जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करायचा आहे, त्याने तो करावा. 40 आम्ही तुम्हाला अगदी जवळ असलेल्या शिक्षेपासून सावध केलेले आहे. ज्या दिवशी मनुष्य त्याच्या हातांनी जी-जी कृत्ये पुढे पाठवलेली असतील, ती स्पष्टपणे पाहून ठेवील. आणि तेव्हा सत्य नाकारणारा म्हणेल, 'मी जर माती असतो, तर (किती बरे झाले असते )!'
टिप्पण्या