मुख्य सामग्रीवर वगळा

आदम अलैहिस्सलाम यांच्याविषयी कुरआन पवित्र मध्ये संदर्भ..

आदम अलैहिस्सलाम यांच्याविषयी कुरआन पवित्र मध्ये संदर्भ...    

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.          

30 जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने स्वर्गदूतांना सांगितले की, मी पृथ्वीवर उत्तराधिकारी नेमणार आहे. (पृथ्वीवर जिन्ननंतर मानवाला वसवण्यात आले.) तेव्हा ते म्हणाले, 'तू पृथ्वीवर अशांना वसवणार आहेस का जे अनाचार घडवतील आणि रक्तपात करतील? (हे प्रभू) आम्ही तर तुझ्या असीम महानतेचे व पावित्र्याचे गुणगान करतो!' अल्लाहने उत्तर दिले, 'तुम्ही ते जाणत नाही, जे मी जाणतो.' 31 आणि अल्लाहने आदमला सर्व गोष्टींची नावे शिकविली. आणि त्या सर्वांना स्वर्गदूतांसमोर उपस्थित केले आणि म्हटले, 'तुमचे म्हणणे खरे असेल, तर मला या सर्वांची नावे सांगा.' 32 त्यांनी उत्तर दिले, 'असीम आहे तुझी महिमा! जे ज्ञान तू आम्हाला प्रदान केले त्याव्यतिरिक्त आम्हाला कोणतेही ज्ञान नाही. निःसंशय तूच सर्व गोष्टींचा जाणकार आणि अस्सल बुद्धिमान आहेस.' 33 तेव्हा अल्लाहने सांगितले, 'हे आदम ! त्यांना यांची नावे सांग. ' जेव्हा आदमने (स्वर्गदूतांना) त्यांची नावे सांगितली. तेव्हा अल्लाहने म्हटले, 'मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का? की, केवळ मीच जाणतो, पृथ्वी व आकाशातील सर्व गुपिते आणि ते सर्व (मीच) जाणतो, जे तुम्ही प्रकट करता आणि जे तुम्ही लपवता.' 

34 आणि (ती वेळही आठवा) जेव्हा आम्ही स्वर्गदूतांना म्हटले, 'आदमसमोर (जो पहिला मानव होता) नतमस्तक व्हा,' तेव्हा ते सर्व (आज्ञेचे पालन करीत) नतमस्तक झाले, फक्त इब्लीस ला सोडून, अहंकारापोटी त्याने तसे करण्यास नकार दिला. अशाप्रकारे त्याने स्वतःला त्या लोकांत सामील करून घेतले जे सत्याला नाकारतात. 

35 आणि आम्ही म्हणालो, 'हे आदम, तू आणि तुझी पत्नी स्वर्गात राहा आणि त्यातून तुम्हाला जे काही खाण्याची इच्छा होईल, मुक्तपणे खा. पण ह्या एका वृक्षाच्या जवळ (कदापि) जाऊ नका, अन्यथा तुम्ही अत्याचारी बनाल.' 36 पण सैतानाने त्या वृक्षाचा बहकाविण्यासाठी साधनरूपी वापर करून, त्याद्वारे दोघांना चूक करायला लावली. अशाप्रकारे त्याने त्यांना ते (ज्या सुखमयी अवस्थेत) होते, त्या अवस्थेतून बाहेर काढण्यास तो कारणीभूत ठरला. आणि आम्ही त्यांना म्हणालो, 'उतरा इथून खाली, तुम्ही (इथून पुढे) एक दुसऱ्याचे शत्रू असाल. आणि एका निर्धारित अवधीपर्यंत पृथ्वीवर तुम्हाला वास्तव्य व निर्वाह करायचा आहे.' 37 त्यांनंतर आदमने आपल्या पालनकर्त्याकडून (प्रार्थनेचे) काही शब्द शिकले, अल्लाहने त्याच्या पश्चात्तापाचा  स्वीकार केला. तो पश्चात्तापाचा स्वीकार करणारा व असीम कृपावंत आहे. 38 (तेव्हा) आम्ही म्हणालो, 'तुम्ही सर्वजण येथून खाली उतरा. आणि जेव्हा तुम्हाला माझ्याकडून मार्गदर्शन प्राप्त होईल, मग जे माझ्या मार्गदर्शनाचे पालन करतील तर (मृत्यूनंतरच्या जीवनात) ते ना कधी भयग्रस्त  होतील, ना दुःखी होतील. 39 पण जे 'सत्य' नाकारण्यावर ठाम राहिले, आणि आमच्या संदेशांना खोटे ठरविले, असेच लोक नरकाचे रहिवासी बनणे अटळ आहे, आणि ते नेहमीसाठी तेथेच राहतील.' 

[कुरआन 2:30-39]

==============================

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.   

11 आणि आम्हीच तुम्हाला निर्माण केले आणि मग आम्ही तुम्हाला आकार दिला. नंतर आम्ही स्वर्गदूतांना म्हटले, 'आदमपुढे नतमस्तक व्हा ' तेव्हा ते सर्व त्याच्या पुढे नतमस्तक झाले, पण इब्लीस  सोडून, तो नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. 12 आणि अल्लाहने म्हटले, 'मी तुला आदेश दिलेला असताना कोणत्या गोष्टीने तुला नतमस्तक होण्यापासून रोखले?' त्यावर इब्लीस म्हणाला, 'मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तू मला अग्नीपासून निर्माण केले आहेस, तर आदमला मातीपासून निर्माण केले आहेस.' 13 (अल्लाहने) म्हटले, 'येथून खाली उत्तर, तू मगरुरीचे प्रदर्शन करावेस, अशी ही जागा नाही. येथून चालत हो ! खरोखर तू नीच आहेस !' 14 तेव्हा सैतान म्हणाला, 'ज्या दिवशी सर्व लोक उठविले जातील त्या दिवसापर्यंत (म्हणजे पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत) मला संधी दे.' 15 आणि अल्लाहने उत्तर दिले, 'तुला संधी देण्यात आली !' 16 तेव्हा सैतान म्हणाला, 'आता जेव्हा तू मला नष्टप्राय ठरवलेले आहेस (म्हणजे माझे बरबाद होणे आता अटळ आहे) तर मीही तुझ्या सरळ मार्गात त्यांच्यासाठी अडसर निर्माण करेन. 17 मी निश्चितच त्यांच्या समोरून, त्यांच्या मागून आणि त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूने त्यांच्याकडे येईन (आणि त्यांना मार्गभ्रष्ट करून सोडेन).  परिणामी त्यांच्यात तुला बहुसंख्य लोक कृतज्ञ नसल्याचेच आढळेल. 18 (आणि अल्लाहने) म्हटले, 'चालता हो येथून, हाकलून लावलेल्या आणि तिरस्कृत अशा (सैताना)! त्यांच्यापैकी जे कोणी तुझे अनुसरण करतील तर मी तुम्हा सर्वांनी नरक भरून टाकीन.'

19 आणि (अल्लाह) आदमला म्हणाला, 'हे आदम तू आणि तुझी पत्नी या बागेत राहा आणि हवे तेथून तुम्हाला पाहिजे ते खा, मात्र या एका वृक्षाच्या निकट फिरकू नका, अन्यथा तुम्ही दुराचारी लोकांपैकी व्हाल.' 20 पण नंतर सैतानाने त्यांना मोहात टाकले, यासाठी की, त्यांची लज्जास्थाने, जी त्यांच्यापासून लपविली गेली होती (म्हणजे त्यांना त्यांची जाणीवच नव्हती), त्यांच्यावर उघड करता यावी, सैतान त्यांना म्हणाला, 'तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला या वृक्षापासून केवळ यासाठी मनाई केली आहे की, तुम्ही दोघे स्वर्गदूतांप्रमाणे होऊ नये किंवा तुम्हाला अमरत्व प्राप्त होऊ नये.' 21 आणि (त्या ढोंगी सैतानाने त्यांना शपथ घेऊन सांगितले की, मी तुमचा (खरा) हितचिंतक आहे.  

22 अशाप्रकारे त्याने (मोठ्या) धूर्तपणे त्यांना चुकीचे पाऊल टाकण्यास प्रवृत्त केले. आणि जेव्हा त्या दोघांनी वृक्षाच्या फळाची चव चाखली, तेव्हा त्यांच्या लज्जास्थानांची त्यांना जाणीव झाली आणि त्या गोष्टी त्यांच्यावर उघड झाल्या, ते बागेतील पाने घेऊन आपल्या लज्जास्थानांवर झाकू लागले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने हाक दिली आणि म्हणाला, 'मी तुम्हाला त्या वृक्षाकडे (जाण्यास) मनाई केली नव्हती का? आणि तुम्हाला असे म्हटले नव्हते का की, सैतान हा तुमचा उघड शत्रू आहे? (तो शत्रूशिवाय दुसरा कोणीच नाही) 23 त्यावर त्या दोघांनी उत्तर दिले, 'हे आमच्या पालनकर्त्या ! आम्ही स्वतःवर फार मोठा अत्याचार करून बसलो आहोत आणि तू जर आम्हाला क्षमा केली नाहीस आणि आमच्यावर दया दाखवली नाहीस तर खरोखर आमचा सर्वनाश होईल.' 24 अल्लाहने म्हटले, 'उतरा  येथून खाली! (या बागेतून) आणि (येथूनपूढे) तुम्ही (पृथ्वीवर) एकमेकांचे शत्रू असाल. आणि विशिष्ट काळापर्यंत तुमच्यासाठी भूतलावर वास्तव्याचे ठिकाण व काही काळ (जीवनातील गोष्टींचा) उपभोग करता येणार आहे.' 25 (अल्लाहने म्हटले), 'याच भूतलावर तुम्ही (आता) जीवन व्यतीत  कराल आणि येथेच तुम्ही मरण येईल आणि (पुनरुत्थानाच्या दिवशी) येथूनच तुम्हाला उठविण्यात येईल.'

26 हे आदमच्या मुलांनो ! आम्ही तुम्हाला पोषाख प्रदान केला (म्हणजे वस्त्रे बनविण्याचे तुम्हाला ज्ञान दिले) म्हणजे त्याद्वारे तुम्ही आपली लज्जास्थाने झाकावीत व ते पाहणाऱ्या डोळ्यांनाही सुंदर दिसावे. पण सदाचरणी वृत्तीचा अंगीकार हेच सर्वोत्तम वस्त्र आहे. ही खूण अल्लाहच्या खुणांपैकी एक आहे. यासाठी की, लोकांनी यापासून धडा घ्यावा. 27 हे आदमच्या मुलांनो! असे होऊ नये की, सैतानाने तुमची (पुन्हा) तशीच फसवणूक करावी ज्याप्रमाणे त्याने तुमच्या आईवडिलांना स्वर्गातून बाहेर काढले होते आणि त्यांना (एकमेकांची) लज्जास्थाने दाखवण्यासाठी विवस्त्र व्हायला लावले होते. तो आणि त्याचे साथीदार तुम्हाला तेथून पाहतात, जेथून तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. आम्ही सैतानांना त्या लोकांचे मित्र बनवले आहे, जे श्रद्धावंत नाहीत. 

[कुरआन 7:11-27]

=========================================

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 

71 जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने स्वर्गदूतांना म्हटले, 'मी (लवकरच) मातीपासून मनुष्य निर्माण करणार आहे. 72 मग जेव्हा मी त्यास पूर्णपणे घडवून टाकेन व त्यात माझा आत्मा फुंकलेला असेन, तेव्हा तुम्ही (सर्व) त्याच्यासमोर नतमस्तक व्हा.' 73 तेव्हा सर्व स्वर्गदूत एकत्र नतमस्तक झाले. 74 पण इब्लीस (सैतान) नतमस्तक झाला नाही, त्याने मी (मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे, म्हणजेच ) मगरुरीचे प्रदर्शन केले. परिणामी तो (सैतान) सत्य नाकारणाऱ्यांमध्ये सामील झाला. 75 अल्लाहने म्हटले, 'हे इब्लीस ! ज्याला (म्हणजेच मानवाला) मी माझ्या हातांनी बनविले आहे, तर त्याच्यासमोर नतमस्तक न होण्यास तुझ्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली? तू हे मगरुरीचे प्रदर्शन करतोस की, तू त्यांच्यापैकी आहेस जे (केवळ) स्वतःला मोठे समजतात.'

76 (त्यावर) सैतान उत्तरला, 'मी मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे, (कारण) तू मला आगीपासून निर्माण केलेस आणि त्याला मातीपासून.' 77 अल्लाहने म्हटले, 'तू तात्काळ येथून (स्वर्गीय परिसरातून) चालता हो, कारण यापुढे तुझ्यावर (आमची कृपा नसून) धिक्कार आहे. 78 आणि न्यायाच्या दिवसापर्यंत तू माझ्या शापाने ग्रस्त असशील.'

79 (त्यावर) सैतान म्हणाला, 'हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत उसंत दे, ज्या दिवशी  लोकांना पुन्हा जिवंत करण्यात येईल.' 80 (अल्लाहने) उत्तर दिले, 'तुला उसंत देण्यात आली. 81 त्या निर्धारित दिवसापर्यंत (ज्याचे ज्ञान केवळ मला आहे.).' 82 (त्यावर) तो म्हणाला, 'तुझ्या सामर्थ्याची शपथ, मी त्या सर्वांना (म्हणजे समस्त मानवजातीस) सन्मार्गापासून बहकावून दूर नेऊन सोडेन. 83 पण यात अपवाद तुझे सच्चे भक्त असतील. (म्हणजे त्यांना मार्गभ्रष्ट करण्यात मी यशस्वी होणार नाही).' 84 अल्लाहने म्हटले, 'सत्य हे आहे, आणि मी बोलतो ते सत्यच असते. 85 की, मी नरकाला, तू आणि तुझे अनुसरण करणारे सर्व लोक, यांनी भरून टाकेन.' 

[कुरआन 38:71-85]

========================================




















  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लुकमान यांचा सत्य वृत्तांत....

लुकमान यांचा सत्य वृत्तांत.... *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.  12 आम्ही लुकमान यास विवेक प्रदान केले होते. व त्यास असे सांगितले होते की, अल्लाहप्रति नेहमी कृतज्ञ राहा. जो कोणी (अल्लाहप्रति) कृतज्ञ राहील तर त्यात त्याचेच भले आहे. तसेच जो कोणी कृतघ्नतेचे प्रदर्शन करील तर अल्लाह स्वयंपूर्ण आहे (त्याला भक्तांच्या आभाराची गरज नाही), तोच आहे सदा स्तुतीस पात्र ! 13 लुकमान (जो एक विवेकशील माणूस होता एकदा) आपल्या मुलास उपदेश करताना म्हणाला, 'हे माझ्या मुलं ! कोणालाही (कधीही) अल्लाहचे समकक्ष ठरवू नकोस. कारण कोणालाही अल्लाहच्या ईश्वरत्वामध्ये सहभागी ठरविणे, फार मोठे अत्याचारी कृत्य आहे.'  14 (अल्लाह म्हणतो) 'आम्ही मानवाला त्याच्या आईवडलांच्या बाबतीत (भली वागणूक करण्याची) ताकीद दिली.' त्याच्या आईने त्याला दुःखावर दुःख सहन करून त्याला आपल्या पोटात ठेवले. मग दोन वर्षांपर्यंत तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहिला (म्हणजे दोन वर्षांपर्यंत ती त्याला अंगावर दूध पाजवीत राहिली). (आम्ही म्हणालो की, तू माझ्या आणि आपल्या आईवडिलांप्रति आभार व्यक्त क...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noha यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...

प्रोफेट नूह (अलैहिस्सलाम) म्हणजेच Noah(नोहा) यांच्याविषयी कुरआन मध्ये अल्लाह (परमेश्वर) ने सत्य वृत्तांत प्रकट केला आहे ...  59  आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकसमूहाकडे पाठविले त्याने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याव्यतिरिक्त तुमचा कोणीही ईश्वर नाही. मला तुमच्याबाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचे भय वाटते.’’ 60  त्याच्या जनसमूहातील सरदारांनी उत्तर दिले, ’’आम्ही तर असे पहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत अडकले आहात.’’ 61  नूह (अ.) ने सांगितले, ’’हे माझ्या जातीबांधवानो! मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही, उलट मी सर्व जगांच्या पालनकर्त्याचा प्रेषित आहे. 62  मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहोचवितो व मी तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाहकडून ते सर्वकाही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. 63  काय तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की तुमच्यापाशी खुद्द तुमच्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या पालनकर्त्याकडून स्मरण आले, जेणेकरून तुम्हाला सावध करावे आणि तुम्ही दुर्वर्तनापासून वाचावे आणि तुम्हावर कृपा केली जावी?’...

67 अल - मुल्क Dominion (The sovereignty)

67 अल - मुल्क Dominion(The sovereignty) *आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. 1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, (हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. (एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की , तुम्हाला आढळतो का कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा - पुन्हा पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही आढळणार नाही). 5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 6  ज...