85 अल - बुरुज
आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 नक्षत्रांचे वेगवेगळे समूह असलेल्या त्या आकाशाची शपथ. 2 वचन दिलेल्या (त्या पुनरुत्थानाच्या) दिवसाची शपथ. 3 साक्ष देणाऱ्याची आणि ज्याच्याविषयी साक्ष दिली जाते त्याची शपथ. 4 नाश पावले खंदकवाले. 5 जो (खंदक) इंधनाने भडकविलेल्या आगीने भरलेला होता. 6 ते त्याच्यापाशी बसलेले होते. 7 श्रद्धावंतांबरोबर जे (अत्याचार) केले जात होते, ते पाहण्यासाठी (तिथे बसलेले होते). 8 त्यांच्याशी त्यांचे शत्रुत्व केवळ यासाठी होते की, त्यांनी अल्लाहवर श्रद्धा धारण केली, जो सर्वशक्तिमान आहे, सर्व प्रकारच्या स्तुतीस पात्र आहे. 9 त्याचीच सत्ता आहे आकाशात आणि पृथ्वीवर आणि तो प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे. 10 जे लोक श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया यांचा छळ करतात. आणि त्याबद्दल त्यांनी पश्चात्ताप केला नाही तर अशांना निश्चितपणे नरकात (विविध) शिक्षा भोगाव्या लागतील. (शिवाय) त्यांना जळण्याची शिक्षाही भोगावी लागेल. 11 पण जे लोक श्रद्धा धारण करून सत्कर्मे करतात, त्यांना मोबदल्यात अशा बागा प्रदान केले जातील, ज्यातून पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह वाहत असतील. आणि हेच सर्वश्रेष्ठ यश होय. 12 तुमच्या पालनकर्त्याची पकड फार कठोर असते. 13 तोच प्रथम निर्माण करतो आणि तोच दुसऱ्या वेळेसही निर्माण करेल. 14 तोच फार क्षमाशील आहे व प्रेमळ आहे. 15 समस्त सृष्टीच्या सत्ताकेंद्राचा स्वामी. 16 तो इच्छितो, ते करून टाकतो. 17 त्या सैन्यांविषयी वृत्तांत तुम्ही ऐकले नाही का? 18 फिरऔन व समूदच्या 19 (हे संदेश ऐकूनही) सत्य नाकारणारे सत्य नाकारण्यावर ठाम आहेत. 20 पण अल्लाहने त्यांना सर्व बाजूंनी वेढून ठेवलेले आहे. 21 हे कुराण एक महान ग्रंथ आहे - यात शंकाच नाही. 22 जे सदैव सुरक्षित अशा लेखशिलेवर लिहून ठेवलेले आहे.
============================
टिप्पण्या