84 अल - इनशिकाक
आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जेव्हा आकाश फाटून जाईल. 2 आणि तो आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन करेल, जे त्याचे कर्तव्य आहे. 3 आणि जमिनीला पसरवून अगदी सपाट प्रदेश बनविण्यात येईल. 4 तिच्यामध्ये जे काही आहे, ते सर्व बाहेर टाकून ती रिकामी होऊन जाईल. 5 ती आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन करील, जे तिचे कर्तव्य आहे. 6 हे मानवा ! आपल्या पालनकर्त्याकडे जाण्याचा तुझा परिश्रमपूर्वक प्रवास सुरु आहे, फार खडतर (प्रवास). आणि त्याला तू भेटणार आहेस. 7 तेव्हा ज्याची कर्मवही त्याच्या उजव्या हातात दिली जाईल. 8 त्याचा हिशेब लगेच सहजपणे आटोपला जाईल. 9 आणि तो आपल्या लोकांकडे आनंदाने परत येईल. 10 आणि ज्याची कर्मवही त्याच्या पाठीच्या मागून देण्यात येईल. 11 तो, त्याला कायमस्वरूपी संपवून टाकण्यासाठी विनवणी करील. 12 आणि तो धगधगत्या आगीत प्रवेश करेल. 13 तो आपल्या लोकांमधे खुशाल ( व निश्चित ) राहत होता. 14 आपल्याला (एके दिवशी अल्लाहकडे) परत जावे लागेल असे त्याला कधीही वाटत नव्हते. 15 अर्थातच ! (त्याला परत यावे लागणारच होते) त्याचा पालनकर्ता नेहमी त्याच्यावर नजर ठेवून होता. 16 मी संधिप्रकाशाची शपथ घेऊन सांगतो, 17 आणि रात्रीची आणि ती ज्यांना -ज्यांना (स्वतःच्या अंधारात) गडप करते त्यांची. 18 आणि चंद्राची जेव्हा तो पूर्ण होतो. 19 की, तुम्हाला एका अवस्थेतून निश्चितपणे दुसऱ्या अवस्थेत जावे लागणार आहे. 20 त्यांना झाले तरी काय की, ते श्रद्धा धारण करीत नाहीत? 21 आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुराणाचे संदेश पठण केले जातात, तेव्हा ते (अल्लाहप्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी) त्याच्यासमोर नतमस्तक होत नाहीत. 22 पण जे सत्य नाकारण्यावर ठाम आहेत ते (या संदेशांना) खोटे ठरवीत असतात. 23 ते (आपल्या मनात ) काय दडवून ठेवत आहेत, ते अल्लाहला सर्व माहीत आहे. 24 (पैगंबर !) त्यांना दुःखदायी शिक्षेची वार्ता ऐकवा. 25 पण जे लोक श्रद्धा धारण करून चांगली कृत्ये करतात, त्यांच्यासाठी कधीच न संपणारा चांगला मोबदला आहे.
================================
टिप्पण्या